ठाणे - पालिका मुख्यालयाजवळील पाचपाखडी परिसरात शुक्रवारी एक झाड कोसळून त्याखालील तीन वाहनांचा चुराडा झाला, आणि जवळील कंपाऊंड भिंतही पडली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाने येऊन झाड बाजूला केले.
ठाणे शहरात झाड पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत शेकडो झाडे पडली असून त्यात ठाणेकरांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. पालिका मुख्यालयाजवळील पाचपाखडी परिसरातील बनाचा पाडा येथे शुक्रवारी सकाळी ५ च्या सुमारास एक मोठे झाड कोसळले. यामुळे सेंटर पॉइंट सोसायटीची कंपाऊंड भिंत पडली तर झाडाखाली असलेल्या तीन वाहनांचा चुराडा झाला आहे.
या चुरडलेल्या वाहनात एक स्कोडा गाडी, एक ऑटो रिक्शा आणि एका टाटा मॅक्सीको टेम्पो चा समावेश आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाने येऊन झाड बाजूला केले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही.