नवी मुंबई - निसर्ग चक्री वादळामुळे पनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हाहाकार उडाला. यामध्ये इमारतीवरील पत्रे उडाली, वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच जुना मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात आज झालेल्या वादळामुळे महाकाय वृक्ष पोलीस ठाण्याच्या इमारतीवर कोसळून मोठे नुकसान झाले.
इमारतीवरील पत्र्यांची संपूर्ण नासधूस झाली असून इमारतीचे नुकसान झालेले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर कळंबोली पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी अग्निशमन विभागाला कळवून वृक्ष हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच जुना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 54 लहान मोठी झाडे पडून पूर्ण रस्त्यावरील येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला होता.
खारपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर बॅनर बोर्ड, तसेच पत्र्याचे शेड पडले होते. त्यामुळे या मार्गावरही वाहतुकीस अडथळा येत होता. त्यामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी 3 जेसीबी मशिनच्या साह्याने पडलेली हटविण्यात आली व वाहतुकीचा मार्ग सुरळीत सुरू केला. रस्त्यावर वादळामुळे कोसळलेले इलेक्ट्रिक पोल तुटलेल्या तारा यांच्या दुरुस्तीबाबत विद्युत मंडळाचे अधिकारी यांनाही पोलिसांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.