ठाणे - काल (दि. 8 जून) रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि रेल्वेचे सर्व दावे पाण्यात वाहून गेले. आज (दि. 9 जून) सकाळपासून मुंबईतील सायन-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी व मुंबईकडून येणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.
चुनाभट्टीजवळ पाणी तुंबल्याने मुंबईहून वाशीकडे जाणारी हार्बर सेवाही बंद झाली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका ठाण्याहून कर्जत, कसारा मार्गे जाणाऱ्या गाड्यांना मात्र बसला नसल्याने त्या मार्गांवरची सेवा सुरू आहे.
मुंबईकडे जाणारी व मुंबईहून येणारी सेवा बंद झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूप हाल झाले. काल रात्रीपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील रस्त्यांवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचल्याने पादचाऱ्यांना वाट काढत जावे लागत असून वाहनचालकांना देखील वाहने जपून चालवावी लागत आहेत.
हेही वाचा - ठाणे रेल्वे तिकीट काउंटरवरील रेल्वे कर्मचाऱ्याने महिलेला केली शिवीगाळ, पाहा व्हिडिओ..