ठाणे - अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये सकाळी ऐन गर्दीच्यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, तासाभरात दुसरे इंजिन जोडून इंद्रायणी एक्सप्रेस रवाना करण्यात आली. या घटनेमुळे कल्याण-कर्जत डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने धावत आहे.
हेही वाचा - कोकणच्या गाड्या रद्द, संतप्त प्रवासी रेल्वे रुळावर
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल गाड्यांची सेवा ऐन गर्दीच्या वेळेत कोलमडली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकामध्ये या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला होता. यामुळे अंबरनाथहून कर्जतला जाणारी लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा फटका अप दिशेच्या वाहतुकीलाही बसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, इंद्रायणी एक्सप्रेस पुन्हा मार्गी लावण्यासाठी दुसरे इंजिन तासाभरात जोडून पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबईची लाईफलाईन पूर्ववत; नागरिकांना दिलासा