ठाणे- गुजरातहून वसई मार्गे कल्याणात अवैधरित्या गुटखा आणणाऱ्या ट्रकला वाहतूक पोलिसांनी पकडले आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील दुर्गामाता चौकात घडली आहे. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह चालकाला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बापूसाहेब सुखदेव कराळे असे गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या चालकाचे नाव आहे.
राज्य शासनाच्या वतीने ५ वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी करण्यात आली. मात्र, आजही जिल्ह्यातील बहुतांश शहरातील पान टपरीवर बिनधाकपणे गुटखा विक्री होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. अशातच आज सकाळपासून दुर्गाडी किल्ल्याच्या लगत असलेल्या दुर्गामाता चौकात वाहतूक पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी होत होती. त्या दरम्यान एका टेम्पोमध्ये पोलिसांना काही गोण्या आढळूल्या. गोण्यांबाबत वाहन चालक बापूसाहेब सुखदेव कराळे याला विचारले असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टेम्पोमधील गोण्या उघडून पाहिले असता त्यामध्ये प्रतिबंधीत गुटखा आढळला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी ट्रक व चालक बापूसाहेब कराळे याला ताब्यात घेतले. टेंपोमधील ८ ते १० गोण्यांमध्ये अंदाजे ५ लाखांचा गुटखा असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, वसईहून कल्याण शहरात टेम्पोने आणलेला सुमारे ६०० ते ७०० किलो गुटखा कल्याणमधील एका गुटखा विक्री करणाऱ्या तस्कराकडे पोहोचणार होता. मात्र, त्या आधीच वाहतूक पोलिसांनी हा टेम्पो पकडल्याने गुटखा माफियांची टोळी कल्याणात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. तर, वाहतूक पोलिसांनी टेम्पोसह चालकाला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
हेही वाचा- तुमचा 'हा' प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल - शरद पवार