ठाणे - पावसाळा सुरू होताच विविध शहरातील महामार्गावरील खड्डे डोके वर काढतात. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. विशेष म्हणजे ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात. मात्र रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य 'जैसे थे' असल्याचे दिसून येत असल्याने वाहतूक पोलिसांना खटकले म्हणूनच भिवंडी शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे.
'प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे जैसे थे'
भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी सांगितले, की सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने आज सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीतील विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस अधिकारी मायने यांनी असेही सांगितले आहे. मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी - कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात व नुकसान देखील खड्यामुळे होत असल्याने याला सर्वस्वी जबाबदार नागरिक वाहतूक पोलिसांना ठरवतात. त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आज वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवावी, की रस्त्यांवरील खड्डे बुजवावे
पंधरा दिवसापूर्वी मनसैनिकांनी खड्ड्यांच्या विषयावरून मालोडी टोलनाका फोडला होता. तसेच पडघा टोल नाका व कशेळी टोल नाका या दोन्ही टोल नाक्यांवर आंदोलन करून टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रस्त्यांवरील खड्याच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला होता. शिवाय खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील विविध मार्गावरून काढण्यात आली. त्यावेळेस तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र त्याही रस्त्यांवर खड्ड्यांनी डोके वर काढले आहेत. त्यामुळेच वाहतूक पोलिसांवर खड्डे भरण्याची वेळ आली असून वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवावी की रस्त्यांवरील खड्डे बुजवावे हाच खरा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री स्तरावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल - जलसंपदा मंत्री