ठाणे - ठाणेकरांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी रस्त्यावर आज थेट गणपती बाप्पाच अवतरले होते. नुकतीच केंद्र सरकारच्या आदेशाने सर्वच राज्यात वाहतुक नियमांच्या उल्लंघनानानंतर होणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होण्याची शकता वाढली आहे. हे टाळून जनजागृती करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हा अनोखा प्रयोग केला आहे.
कुणी हेल्मेट घातले नव्हते, तर कुणी चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्ट लावला नव्हता अशा अनेकांना साक्षात गणपती बाप्पाने वाहतूकीचे नियम समजावून सांगितले. तसेच, जे लोक नियम पाळत आहेत त्यांना आशिर्वाद आणि मोदकही दिले. हे पाहून अनेक ठाणेकरांची भंबेरी उडाली होती. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ही अनोखी मोहीम राबवली.