ठाणे - कल्याणमधील राया गाव परिसरात 23 जून रोजी एका पूलाखाली महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. या संदर्भात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात कल्याण पोलिसांना आता यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ज्या गोणीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता त्या गोणीला मोठ्या प्रमाणात कोंबडीची पिसे लागलेली होती. यावरून एखाद्या चिकन व्यवसाय संबंधित व्यक्ती या गुन्ह्यात असावी व मृतदेहाच्या कमरेला बांधलेल्या तावीजवरून संबंधित महिला पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला. यासंदर्भात अधिक तपास केला असता, टिटवाळा नजीकच्या बनेली गावातील चिकन सेंटर चालवणारा जाने आलम हा घटनेच्या दिवसापासून अचानक पश्चिम बंगालमध्ये गेल्याचे पोलिसांना समजले तसेच त्याला भेटायला येणारी महिला ही बंगाली असल्याचे समजले. याच आधारावर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली तर त्याचा दुसरा साथीदार मनोउद्दीन शेख याचा पोलीस शोध घेत आहेत.
मृत महिला व आरोपी आलम शेख याची तीन महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. पुढे त्यांच्यातील जवळीक वाढून त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. या नंतर महिलेने आलम शेखला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली व त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते. हेच पैसे आलम तिच्याकडे वारंवार मागत होता. मात्र ती पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने आलमने मित्र मनोउद्दीन शेख याच्या मदतीने 22 जून रोजी महिलेचा खडवली येथे राहत्या घरी मफलरच्या साह्याने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी एका गोणीत भरून तो पुलाखाली फेकला व जाळला. कुठलाही ठोस पुरावा नसताना ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांनी केलेली कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे.
