ठाणे - वडापाव खाल्ल्यानंतर तीन जणांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात वडापाव विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सुरू आहे.
कल्याण येथील संजय भोदादे, प्रवीण वाघ आणि कारभारी पवार या तिघांनी सायंकाळच्या सुमारास रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडापाव सेंटर मधून तीन वडापाव खाल्ले. मात्र त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील संजय आणि प्रवीण या दोघांना विषबाधेचा जास्त त्रास झाल्यावर दोघांनाही पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात भादंवि कलम 273 अंतर्गत वडापाव विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देऊन त्यांच्यामार्फत पुढील तपास सुरू केला आहे. 'वडापाव खाऊन विषबाधा होत नाही. या तिघांनी दुसरे काहीतरी खाल्ले असावे, मेडिकल रिपोर्ट आल्यावर पाहू,' असे वडापाव दुकान मालकाने म्हटले आहे.
पावसाळ्यात उघड्यावरील पदार्थ तसेच हातगाड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, असे आवाहन पालिकाप्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात येते. तरीही काही नागरिकांना गरम पदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र असे पदार्थ खाण्याने त्यांच्या अंगलट आला आहे.