ठाणे - दिल्लीच्या तीन भामट्यांनी उल्हासनगरच्या मोबाईल विक्रेत्याला 5 लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मोबाईल विक्रेत्याने ऑनलाईनद्वारे 4 लाख 90 हजार रूपये किमतीची 213 मोबाईलची ऑर्डर दिल्लीत त्या भामट्यांना दिली होती. मात्र, ऑर्डरच्या बदल्यात दिल्लीच्या भामट्या व्यापाऱ्यांनी मोबाईल ऐवजी रद्दीने भरलेले मोबाईलचे रिकामे बॉक्स आणि केवळ चार्जर पाठवून व्यापाऱ्याची फससवणूक केली आहे.
याप्रकरणी उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विकास सावंत (वय 26 वर्षे) असे फसवणूक झालेल्या मोबाईल विक्रेत्याचे नाव आहे. तर मोहम्मद इस्तकार, रहीसुद्दीन इस्तकार, मुसाहिद हुसेन (रा. लक्ष्मीनगर, दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या भामट्या व्यापाऱ्यांची नावे आहे.
मिळोलल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील सुभाषनगर परिसरात राहणारा विकास सावंत या तरूणाचा उल्हासनगर कॅम्प 3 येथे मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. विकास हा काही महिन्यांपूर्वी हैदराबाद येथे गेला असताना त्याची ओळख दिल्लीच्या लक्ष्मीनगरमध्ये राहणारे मोहम्मद इस्तकार, रहीसुद्दीन, मुसाहिद हुसेन या तिघांसोबत झाली होती. त्यावेळी आरोपींनी विकासला तुम्ही आमच्याकडून मोबाईल खरेदी करत जा. तुम्हाला इतर कंपनीपेक्षा कमी किंमतीमध्ये आम्ही मोबाईल फोन देवू, असे सांगितले. त्यामुळे विकास हा दिल्लीतील आरोपींच्या दुकानातून जुने मोबाईल खरेदी करत उल्हासनगर येथील दुकानात विक्री करीत होता. विकासने तीन वेळा आरोपींकडून मोबाईल फोन खरेदी केले होते. त्यामुळे आरोपींवर विकास याने विश्वास ठेवून डिसेंबर महिन्यात 213 मोबाईल फोनसाठी ऑनलाईनद्वारे 4 लाख 90 हजार रूपये पाठविले. त्यांनतर विकासला 213 मोबाईल फोनचे पार्सल मिळाले. हे पार्सल त्याने उघडून बघितले असता त्याला धक्काच बसला. त्या पार्सलमध्ये चक्क मोबाईलचे रिकामे बॉक्स व कागदाची रद्दी भरलेली होती. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी एक पार्सल आले. ते ही पार्सल विकास याने उघडून पाहिला असता त्यामध्ये कागदाची रद्दी व केवळ मोबाइल चार्जर होते.
हेही वाचा - ठाणे : भिवंडी तालुक्यात 40 दुचाक्या घसरुन 25 जण जखमी, 'हे' आहे कारण
दरम्यान, या घटनेनंतर विकासने तिन्ही आरोपींच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मोबाईल फोन बंद होते. तसेच दिल्ली येथील लक्ष्मीनगर परिसरात ज्या दुकानाचा पत्ता त्या तिघांनी दिला होता. त्या ठिकाणी जावून विकासने खात्री केली असता ते तिघेही त्या ठिकाणावरील दुकान बंद करून पसार झाल्याचे समजले. त्या तिघांनीही मोबाईल फोन ऐवजी मोकळे बॉक्स, रद्दी व मोबाईल चार्जर पाठवून 4 लाख 90 हजार रूपयांची फसवणूक केली.
हेही वाचा - ठाण्यात 'फ्लेमिंगो'चे आगमन... पक्षीप्रेमी आनंदीत
या प्रकरणी विकास सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी मोहम्मद इस्तकार, रहीसुद्दीन, मुसाहिद हुसेन या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत असून पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करताना ग्राहाकांनी दक्षता बाळगावी जेणे करून आपली फसवणूक होणार नाही, असे आव्हानही नागरिकांना केले.
हेही वाचा - दार अडवणाऱ्या टवाळखोर प्रवाशांमुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी