ठाणे - यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लाखो नागरिक बाधित झाले असून यामुळे अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा संकटसमयी शासन-प्रशासन यासोबतच प्रत्येक नागरिकांची जबाबदारी कोरोनाला रोखण्याची आहे. त्यामुळे यंदाच्या सर्वधर्मीय धार्मिक उत्सव, सण साजरे करणाऱ्यावर सामाजिक अंतर राखण्याचे निर्बंध आले आहेत. या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा या सामाजिक संस्थेच्या वतीने साजरा होणारा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. यंदा थ्रीडी डिजिटल देखावा उभारण्यात आला असून त्यामुळे सर्व गणेशभक्तांना घरबसल्या दर्शन घडणार आहे.
विशेष म्हणजे गणरायाचे आगमन काही तासांवर आले असताना थ्रीडी गणरायाचे डिजिटल चल चित्र सर्वात आधी 'ई-टीव्ही भारत'च्या माध्यमातून लाखो गणेश भक्तांना दाखवण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
यंदा साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त आपल्या भव्यदिव्य देखाव्यांच्या परंपरेला बाजूला सारून या मंडळाने अत्यंत लहान मंडप तयार करून त्यामध्ये अडीच फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश मंडपात दर्शनासाठी भाविकांना प्रवेश दिला जाणार नसून त्यांना घरबसल्या दर्शनाची व्यवस्था युट्युब, फेसबुक व केबल नेटवर्किंगच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच गणेश मंडपात कार्यकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सॅनिटायझर, थर्मोस्टॅट, पल्स मीटर तपासणी करणे, हातमोजे, मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. तर कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची अधिक गरज भासत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गणेश उत्सव काळात दहा दिवस ठाणे येथील वामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने भारतरत्न अब्दुल कलाम महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात 2100 रक्तदात्यांचे रक्त जमा करण्याचा संकल्प केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखतीत दिली आहे.
यासोबतच गणेशोत्सव काळात मोफत नेत्रचिकित्सा, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलीस दल यामधील कर्मचारी, अधिकारी हे कोरोना बाधित झाले. परंतु त्यावर मात करत ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. अशा कोरोना योद्धा कर्मचारी, अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान व त्यासोबत सेवाकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली आहे.