ठाणे - मटण विक्रीच्या दुकानातून ३ बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. चार येथील व्हीनस चौक परिसरात असणाऱ्या कुमार मटण शॉपमध्ये घडली.
हेही वाचा - पुरुष जातीचे जीवंत अर्भक नाल्यात सापडल्याने खळबळ; निर्दयी अज्ञात मातेवर गुन्हा
कुमार मटण शॉप या दुकानात बालकामगारांना कामावर ठेवण्यात आले असल्याची माहिती कामगार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीवरून त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने त्या मटण दुकानात सायंकाळच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी त्या दुकानात १६ वर्षीय वयोगटाचे ३ बालकामगार दुकानात काम करत असल्याचे दिसून आले.
कुमार मटण शॉपचे मालकांना त्यांच्यावर आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करून त्यांच्यावर अन्याय करत त्यांना कमी मोबदल्यात जास्त श्रमाची कामे करून घेतली. त्यामुळे या प्रकरणी कुमार मटण शॉपच्या मालकाविरूद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार तवले करत आहेत.
या मटण शॉपमधून त्या तिन्ही बालकामगारांची सुटका करून त्यांना उल्हासनगरातील कॅम्प नं.५ येथे बालसुधारगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळे बालकामगारांना कामावर ठेवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.