ठाणे - वेश्यावस्तीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रियकरासोबत राहणाऱ्या वारंगनावर जीवघेणा हल्ला करून तिच्या प्रियकराला ठार मारल्याची घटना घडली होती. खळबळजनक बाब म्हणजे वेश्यागमनाच्या बहाण्याने तिच्या घरी आलेल्या ग्राहकानेच साथीदारांसह दागिने लुटण्यासाठी वारंगना आणि तिच्या प्रियकराच्या डोक्यात वरवंटा घालून जीव घेण्याचा प्रयत्न केला. यात प्रियकराचा मृत्यू झाला असून प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे.
ही घटना भिवंडीच्या हनुमान टेकडी परिसरातील वेश्यावस्तीतील 5 डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी हल्लेखोर लुटारू त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहे. कासीम उर्फ शहनेशाह रशीद अली शेख (वय 29 वर्षे, रा. रामेश्वर मंदिर जवळ, भिवंडी) त्याची साथीदार शिवानी रवी राठोड (वय 30 वर्षे) आणि तृतीयपंथी फिरोज उर्फ फिरोजा अब्दुल अजीम शेख (वय 30 वर्षे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे. तर काशिनाथ नायक (वय 50 वर्षे) असे मृत प्रियकराने नाव असून अनुसया (वय 45) असे जखमी वारंगनाचे नाव आहे.
हेही वाचा - मटण शॉपच्या दुकानातून तीन बालमजुरांची सुटका; विक्रेत्यावर गुन्हा
भिवंडी शहरातील आसबीबी या रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची वस्ती असून याच वस्तीत एका घरात मृत काशिनाथ व अनुसया हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ६ डिसेंबर रोजी रात्रीपासून सकाळपर्यंत त्यापैकी कोणीही घराबाहेर न आल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेने दरवाज्यातून घरात डोकावण्याचा प्रयत्न केला असता, घरात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर संपूर्ण वेश्या वस्तीत खळबळ उडाली होती. स्थानिकांनी भिवंडी शहर पोलिसांना घटनेची खबर देताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमी अवस्थेत असलेल्या अनुसया हिला उपचारासाठी ठाणे सिव्हील रुग्णालयात हलविले. तर मृत काशिनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
हेही वाचा - 'त्या' बेपत्ता तरुणाचा अनैतिक संबंधातून खून; मृतदेहाचा सांगाडा सापडल्याने खूनाचा छडा
घटनेच्या रात्री आरोपी महिला व तृतीयपंथी हे दोघे परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हातात पिशवी घेऊन जात असताना दिसून आले. पोलिसांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करत चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, दोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.
अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना जखमी अनुसयाने वैजापूर या गावी जाण्यासाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करून काही रोख रक्कम जमा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिन्ही आरोपींनी आपसात संगनमत करून ५ डिसेंबर रोजी दागिने व रोख रक्कम लुटण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी कासीम हा अनुसया हिच्यासोबत वेश्यागमन करण्याच्या बहाण्याने त्या रात्री तिच्या घरी आला. त्यावेळी सोबत त्याने मद्याच्या बाटल्या आणि जेवणही आणले होते. आरोपी कासीमने अनुसयासोबत मद्यप्राशन करून त्याने झोपेचे नाटक केले. तोपर्यंत अनुसयाही नशेत असल्याने तिलाही झोप लागली. तर त्याच घरात दुसऱ्या पंलगावर मृत काशिनाथ झोपला होता. ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास आरोपीचे साथीदार महिला व तृतीयपंथी यांनी अनुसयाच्या घरात दागिने व रोख रक्कम लुटण्यासाठी प्रवेश केला. हे तिन्ही आरोपी घरात ठेवलेले दागिने शोधत असतानाच मृत काशिनाथला जाग आली. त्यामुळे आरोपींनी घरातील दगडी वरवंट्याने त्याच्या डोक्यात प्रहार करून त्याला ठार मारले. यावेळी अनुसयालाही जाग आल्याने तिच्याही डोक्यात त्याच वरवंट्याने प्रहार करून गंभीर जखमी करून घरातील दागिने आणि रोख रक्कम पळवली होती.
हेही वाच - मूल होत नाही म्हणून विवाहितेला बेदम मारहाण करून खोलीत डांबले; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
दरम्यान, तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यातील कासीम हा पोलीस रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या तिन्ही आरोपींना उद्या (शुक्रवार) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली.