ठाणे - घरगुती ग्राहकांच्या सिलिंडरमधून गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलिंडर भरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. पाच जणांच्या टोळीतील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांच्या या कारवाईमुळे घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
कल्याण पश्चिमच्या भानू-सागर टॉकीज जवळ भारत गॅस सर्व्हिस सेंटर आहे. तेथे रोहित सूचक, रमाकांत पंठे, रमेश गुरव, दिनेश गॅब्रू आणि उमेश बनसोडे ही 5 जणांची टोळी चोरीछुपे गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हेही वाचा - 'पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकायचा असेल तर भाजपला मतदान करा'
महात्मा फुले चौक पोलिसांनी रविवारी सापळा लावला. यावेळी रमाकांत पंठे, रमेश गुरव, दिनेश गब्रू या त्रिकूटाला पोलिसांनी पकडले. मात्र, रोहित सूचक आणि उमेश बनसोडे या दोघांनी तेथून पळ काढला. अटक केलेल्या तिघांना सोमवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून गॅस चोरी करण्याचे साहित्य व काही गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून सुमारे दोन ते तीन किलो वजनाचा गॅस काढून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलिंडरमध्ये भरून बाजारात विकला जाई. चोरलेला गॅस 1500 रुपयांना काळ्या बाजारात विकत असल्याची चर्चा परिसरात आहे.