ठाणे : मालकांचा खून करून त्यांचा मृतदेह जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना कल्याण तालुक्यातील दहागाव नजीक असलेल्या जंगलात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नोकरासह त्याच्या दोन मित्राला गजाआड करण्यात यश आले आहे. अभिषेक गुप्ता, शुभम गुप्ता आणि नोकर सुनील मौर्य अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर सचिन म्हामने असे खून झालेल्या मालकाचे नाव आहे.
अनैतिक संबध असल्याचा संशय : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृतक सचिन यांचे टिटवाळा भागात सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वस्तूची विक्रीचे दुकान आहे. या दुकानात आरोपी नोकर सुनील हा मृत मालकाचा विश्वासू असल्याने त्याच्यावर दुकानातील वसुलीचीही जबाबदारी दिली होती. मात्र, काही दिवसापूर्वी मृत मालकाला आपल्या बायकोशी नोकर सुनीलचे अनैतिक संबध असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद विवाद होत होते. याच वादाला वैतागून आरोपी नोकराने मालकाच्या खुनाचा कट रचला होता. त्यासाठी त्याने दोन मित्राची मदत घेतली.
मालकाचा मृतदेह जमिनीत पुरला : ठरल्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी आरोपी नोकराने मृतक मालकाला सोलर पॅनलची ऑडर मिळाली असल्याचे सांगून त्यांच्याच कारमधून त्यांना दहागाव नजीकच्या जंगलात घेऊन गेला. या ठिकाणी आदीपासून दोन्ही आरोपी मित्र दबा धरून बसले होते. त्यातच जंगलात पुन्हा नोकर, मालकात वाद झाला. त्यातच नोकरांने मालकाची गळा आवळून खून केला. खळबळजनक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिन्ही आरोपीने जंगलातच खड्डा खोदून मालकाचा मृतदेह जमिनीत पुरला होता. मात्र, रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांनी मृतदेहावरची माती उकरुन काढण्याचा प्रयत्न केला असता मृतदेहाचा हात बाहेर पडला होता.
पती बेपत्ता झाल्याची तक्रार : मालक सचिन दोन दिवस घरी आला नसल्याचे तो बेपत्ता झाल्याची तक्रार बायकोने दिली होती. त्या तक्रारीचा तपास सुरू असतानाच दहागावमधील काही ग्रामस्थांनी जमिनीत पुरलेल्या मृतदेहाचा हात दिसत आल्याची माहिती कल्याण तालुका पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी त्यावेळी घटनास्थळाच्या काही अंतरावर मृतक मालकाची कार उभी असल्याचे दिसून आले होते.
तीघांवर गुन्हा : पोलिसांना नोकर सुनीलवर संशय आल्याने त्याला टिटवाळा भागातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मित्राच्या मदतीने मालकाचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्या आधारावर तिघा आरोपीवर खुन, पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास कल्याण तालुका पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - Aditya Thackeray : कांजूरमधील ती 15 हेक्टर जागा नेमकी कुणाची; आदित्य ठाकरे यांचा सवाल