नवी मुंबई - स्वॅब न घेता अडीच हजार रुपयांमध्ये नामांकित लॅबचे नाव वापरून कोरोना निगेटिव्ह टेस्ट असल्याचे बनावट अहवाल तयार करुन देणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सापळा लाऊन गजाआड केली आहे.
आरोपींच्या मोबाइलमध्ये अनेक व्यक्तींचे बनावट रिपोर्ट
नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केलेल्या तिघांच्या मोबाईलमध्ये अनेक व्यक्तींचे बनावट कोविड टेस्ट रिपोर्ट आढळून आले आहेत. या टोळीने अनेकांची बनावट कोविड निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट देऊन फसवणूक केली आहे. गुन्हे शाखेकडून या तिघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
असा रचला सापळा
खारघर सेक्टर-35 मध्ये राहणारा साजीद दाऊद उपाध्ये (वय 47 वर्षे) हा अडीच हजार रुपयांमध्ये कोरोनाचे वेगवेगळ्या लॅबचे बनावट कोविड निगेटिव्ह अहवाल तयार करुन देत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार साजीद उपाध्ये याच्याकडे एका व्यक्तीसह एका पोलीस कर्मचाऱ्याला कोविडचे बनावट निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन घेण्यासाठी पाठवले होते. त्यानुसार या दोघांनी साजीद उपाध्ये याची खारघर सेक्टर-35 मध्ये भेट घेतली बनावट कोविड निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट बनवून देण्यासाठी आधारकार्ड व मोबाईल नंबर अडीच हजार रुपये द्यावे, असे साजिद उपाध्ये यांनी सांगितले. साजीद उपाध्ये याने दोन दिवसानंतर त्यांना रिपोर्ट घेण्यासाठी येण्यास बोलवले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.6 मे) दुपारी सहायक पोलीस निरीक्षक निलेश तांबे, यांच्यासह त्यांच्या पथकाने खारघर सेक्टर-35 भागात सापळा लावला. यावेळी साजीद उपाध्ये याने तयार केलेले नामांकित लॅबचे बनावट कोविड निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट खासगी व्यक्तीला दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याला अनिकेत दुधावडे (वय 21 वर्षे) या व्यक्तीने निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन दिल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी अनिकेत दुधावडे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर राहुल पांडे (वय 23 वर्षे) याने हे रिपोर्ट तयार करुन दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्यावरुन तिघांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. न्यायालयाने या तिघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा - नवी मुंबईत कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य