मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पूर्वेच्या एसव्ही रोड येथील आशिष इमारतीत 9 ऑगस्टला दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली होती. दीपक पोतदार यांच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
48 तासात पोलिसांनी केली आरोपीला अटक
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दीपक पोतदार हे कामानिमित्त दुपारी बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपीने संधी साधत घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील दागिने, मोबाईल, महागडे घड्याळ चोरी करून पसार झाला. सायंकाळी दीपक पोतदार हे घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्र जोरात सुरू केली आणि सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिकदृष्ट्या तपास करून 48 तासात आरोपीला नालासोपारामधून अटक केली आहे. त्यामध्ये आरोपीने गुन्हा केल्याचे काबूल केले. नवघर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तीन लाखांपेक्षा अधिक दागिने अन् इतर साहित्य जप्त
नालासोपारामधून अटक केल्यानंतर चोरीला गेलेला माल जप्त करण्यासाठी नवघर पोलिसांना मेहनत करावी लागली. यामध्ये चोरीला गेलेले अडीच लाखांचे दागिने, मोबाईल, घड्याळ जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाला असून आरोपीने गुन्हा कबूल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.