ठाणे : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यातील ग्रामीण हद्दीत मिठपाडा गाव आहे. या गावात ऍडोन एक्स्पोर्ट कंपनीचे गोदाम असून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे शर्ट, पॅन्ट, टीशर्ट, पडद्याचा कपडा, पॅन्टच्या पॉकेटला लावण्यात येणार कपडा, सलवार सुटचा कपडा आणि रेडिमेड तयार केलेले कपडे साठवून ठेवले होते. त्यातच ८ जानेवारी २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या गोदामातून ९९ लाखांच्यावर रेडिमेड कपडयांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या जबरी चोरीचा तपास पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. दरम्यान गोदाम नजीक घटनास्थळी एक रिकामी पिण्याच्या पाण्याची बाटली व वेफर्सची रिकामे रॅपर आढळून आले.
हॉटेलच्या कॅमऱ्यात चोरटा कैद : विशेष म्हणजे चोरट्याने चोरी करीत असताना गोदामातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरी करून नेल्याने पोलिसांना ठोस असा कोणताही पुरावा मिळाला नव्हता. त्यामुळे पोलीस पथकाने त्या पाण्याची रिकामी बाटली व वेफर्स रिकामे रॅपर परिसरातील कुढल्या दुकानातून खरेदी केलेले आहे, याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली. तपासात त्याच परिसरातील एका हॉटेलमधली ही बाटली चोरट्याने खरेदी केल्याचे असल्याचे समोर आले. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये चोरटा परशुराम सरवदे हा पाण्याची बाटली खरेदी करताना दिसून आला.
चोराला केली अटक : त्यानंतर सीसीटीव्ही फुटजेमध्ये दिसणाऱ्या चोरट्याचा पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय मारणे, पोलीस उपनिरी सचिन कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरी सुनील सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी अल्लाड, शंकर निवळे, सुशीलकुमार धोत्रे, नीलकंठ खडके, इब्राहिम शेख, सोनावणे, सांबरे, आटपाडकर, कोळी, अनिल सापटे,विजय ताठे या पोलीस पथकाने घटनास्थळावरील डम डाटा वरून चोरट्याचा मोबाईल नंबर प्राप्त केला. त्या मोबाईल नंबरच्या आधारे चोरटा हा भिवंडीतील अंजुरफाटा परिसरात असलेल्या साठेनगर या ठिकाणी असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने साठे नगरमध्ये सापळा रचून अटक केली आहे.
कपडे आणि डिव्हीआर जप्त : चोरट्याने लाखोंचे चोरी केलेले कपडे त्याने तो राहत असलेल्या परिसरातील एका गोदामात लपवून ठेवले होते. पोलिसांनी चोरट्याला अटक करून ९९ लाख ३९ हजार २६० रुपये किमतीचे कपडे आणि पाच हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.