ठाणे - बदलापूर शहरात चोऱ्या, घरफोड्या, लुटमारीच्या घटनेत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अशातच शहरातील पश्चिम परिसरात असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम मशीन फोडणाऱ्या २ चोरट्यांना बदलापूर पश्चिम पोलिसांनी रंगेहात पकडले. चेतन कडलक आणि दीपेश चौधरी अशी दोघा चोरट्यांची नावे आहेत.
हे दोघेही काल पहाटे ४ वाजताच्या सुमारास मोहनानंद परिसरातील कँनरा बँकेचे एटीएम मशीन फोडत होते. दरम्यान हा प्रकार एका जागरूक नागरिकाने पाहिला. त्याने या घटनेची माहिती पोलीसांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चोरट्यांना रंगेहात अटक केली.
एटीएम मशीन फोडण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेफ्टी अलार्मचे वायर्स कापून त्यांना बंद केले होते. त्यानंतर त्यांनी ए.टी.एम लुटण्याचा प्रयत्न केला होता. या दोघा चोरट्यांकडून पोलीसांनी लोखंडी रॉड, स्क्रु-ड्रायव्हर, आदी साहित्य जप्त करून दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यांना पकडल्यामुळे यापूर्वी घडलेल्या काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.