ठाणे : ग्रामीण भागातील रेल्वे स्थानक परिसरातून बाईक चोरीच्या घटनात सातत्याने वाढ होत असतानाच, पुन्हा टिटवाळा रेल्वे स्थानकातील तिकीट घरासमोर असलेल्या पार्किंगमधून महागडी बुलेट चोरटयाने लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे बुलेट चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला आहे.
बुलेट चोरीला : तक्रारदार नरेश सुरेश शेलार (वय २६) हा कल्याण तालुक्यातील पिसे-आमने गावात कुटूंबासह राहतो. तक्रारदार नरेशचा भाऊ भावेश शेलार हा ठाणे शहारत नोकरी करतो. त्यातच भावेश हा नोकरीवर जाण्यासाठी १८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास बुलेट घेऊन निघाला होता. टिटवाळा रेल्वे स्थानकातून ठाणेकडे जाणारी लोकल पकडून नोकरीच्या ठिकाणी त्याने ठरविल्याने बुलेट टिटवाळा रेल्वे स्थानकातील तिकीट घरासमोर असलेल्या दुचाकी पार्किंगमध्ये उभी करून लोकलने ठाणे शहरात गेला होता.
शोध घेऊनही बुलेट सापडली नाही : त्यानंतर सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास पुन्हा टिटवाळा रेल्वे स्थानकात पोहचून पार्किंगच्या ठिकाणी बुलेट घेण्यासाठी गेला होता. मात्र त्याला बुलेट पार्किंगमध्ये आढळून आली नाही. त्यांना बुलेट सापडली नसल्याने त्यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात २० एप्रिल रोजी धाव घेऊन बुलेट चोरीचा अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.
चोरटा सीसीटीव्हीत कैद : तक्रारदार नरेशने दिलेल्या माहितीनुसार २०१९ साली दोन लाखाला बुलेट खरेदी केली होती. तर चोरटा बुलेट घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसत असूनही पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे बुलेट चोरीला जाऊन १८ दिवस झाले तरी, देखील तालुका पोलिसांना चोरट्याचा तपास का लागत नाही. यावरूनही तक्रारदार नरेशने पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली.
बुलेट चोरटा लवकरच अटक होणार : या संदर्भात पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, गेल्या १५ दिवसात ६ दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तीन गुन्हे लवकरच उघडकीस आणून त्यामध्ये बुलेट चोरटयाचा शोध घेऊन त्यालाही लवकरच अटक केले जाणार असल्याचे सांगितले. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक मांडोळे करीत आहेत.