ठाणे - वाहतूक विभागाच्या पोलिसांनी शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या मॉडिफाय बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोजर फिरवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने मॉडिफाय बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत जवळपास १०४ बुलेटवर कारवाई करण्यात आली. त्यांचे मॉडिफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले. त्या सायलेन्सरवर दुर्गाडी चौकात बुलडोजर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले.
एकूण ११६ वाहनांवर कारवाई
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बुलेटचे यांत्रिक भाग व तांत्रिक रचनेत बदल केलेल्या तसेच काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सोमवारपासून कल्याण शहरातील वाहतूक उपशाखेमार्फत परिसरातील दुर्गाडी, सुभाष चौक, शहाड नाका व पत्रीपूल या भागात वेगवेगळी पथके तैनात केली. तेथे मॉडिफाय केलेल्या बुलेटसह यांत्रिक व तांत्रिक रचनेत बदल केलेल्या एकूण ११६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात १०४ बुलेटचे सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले.
वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावणाऱ्या चालकांवर कारवाई
प्रचलीत मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करुन एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावणाऱ्या एकूण ६४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहनांच्या काचेवर लावलेली काळी फिल्म काढून त्यांच्याकडून एकूण १२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेदेखील कारवाई सुरु राहणार आहे.
कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण
बुलेट मॉडिफाय केल्याने त्यांच्या सायलेन्सरमधून कर्कश आवाज येतो. त्यामुळे वायू प्रदूषण होते. तसेच वाहने रस्त्यावरुन कर्णकर्कश आवाज करत अनियंत्रीत वेगाने चालवल्याने पादचारी, जेष्ठ नागरिक व लहान मुलाच्या आरोग्यास, सुरक्षिततेस धोका निर्माण होतो. सार्वजनिक शांततेचा भंग होतो. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईचा बडगा उगारला आहे.
हेही वाचा - ठाण्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच केला खून; पत्नीसह प्रियकरालाही अटक