ठाणे - डान्सबारमध्ये बारबालांवर अमाप पैसा उडवल्याने चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रियाज रमजान खान, रफिक शेख आणि प्रकाश सूर्यवंशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील बंद कंपन्या फोडून त्यांमधील चोरीचा माल विकून हे त्रिकुट डान्सबारमध्ये अमाप पैसे उडवत होते. या त्रिकुटाने आतापर्यंत सहा कंपन्या फोडून तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसात विविध कंपन्यांमध्ये चोरीच्या घटना घडत होत्या. काही कंपन्यांमधून तर संपूर्ण फिल्टर प्लांट चोरीला गेले होते. मानपाडा पोलिसांनी या सर्व चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरातील रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर विशेष नजर ठेवण्यासाठी तीन ते चार पोलीस पथके तयार करण्यात आली.
असा केला पर्दाफाश-
याच दरम्यान रियाज खान या चोरट्यावर पोलिसांची नजर गेली. तो एका डान्स बारमध्ये नेहमी पैशाची उधळपट्टी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने दोन साथीदाराच्या मदतीने एमआयडीसीतील तब्बल सहा कंपन्यांमध्ये चोरी केल्याचे सांगितले. चोरीचा मुद्देमाल विकून जे पैसे मिळत होते, ते पैसे डान्स बारमध्ये उडवत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या-
गेल्या काही महिन्यापासून डोंगरीच्या आसपासच्या ग्रामीण भागात घरफोडी ,चोरी , चेन स्नेकींग, आधी घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे मानपाडा पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी, ऑपरेशन करत 6 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडूनही पावणे तीन लाखांच्या जवळपास मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.