ठाणे - भिवंडी तालुक्यातील दुगाड गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने रात्रीच्या सुमारास शाळा बंद असल्याने जीवितहानी टळली.
दुगाड गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. या शाळेत परिसरातील गाव पाड्यात राहणारे तब्बल १०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत चार वर्ग आहेत. यातील पहिलीच्या वर्गाचे संपूर्ण छत रात्रीच्या मुसळधार पावसामुळे कोसळले असून अन्य ३ वर्गाच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे भिंती देखील कधीही कोसळण्याची शक्यता वाढली आहे.
ही शाळा २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आली आहे. केवळ सिमेंट-विटांचे बांधकाम असलेल्या ४ वर्ग खोल्यावर लाकडी वासे, बाल, कौले टाकण्यात आलेली आहेत. लाकडी वासे सडल्याने छत कमकुवत झाले होते. त्यामुळे छत कधीही कोसळण्याची भीती यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यातच पाऊस व वारा याचा दाब सोसू न शकल्याने शाळेचे छत शनिवारी रात्रीच्या सुमारास कोसळली. ऐन पावसाळ्यात शाळेचे छत कोसळल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी खासगी घराचा आसरा घ्यावा लागणार आहे.
याबाबत दुगाड ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनंत शेलार यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, ही शाळा मोडकळीस आली आहे. त्यामुळे या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असून या शाळेची दुरुस्तीदेखील करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या दुरूस्तीला विरोध केल्याने शाळेची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळेच आजची दुर्दैवी घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.