ठाणे - बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका विविध पक्ष्यांना बसल्याचे दिसून येत आहे. पक्षीमित्र महेश बनकर यांना एक दुर्मिळ जातीचा असलेला 'रानकस्तूर' पक्षी भुकेनं व्याकुळ झालेल्या अवस्थेमध्ये आधारवाडी परिसरात आढळून आला. महेश यांनी पक्षाला पाणी आणि खाद्य देऊन जीवदान दिले आहे.
हा दुर्मिळ 'रानकस्तूर' पक्षी भारतातील उपखंडात आणि दक्षिणपूर्व आशियात आढळतो. कोकणामध्येही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ‘ऑरेंज हेडेड ग्राउंड थ्रश’ हे दोन पक्षी आढळतात. या काळात या पक्ष्यांचे ओरडणे सर्वत्र ऐकू येते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून हे पक्षी घरटे बांधायला सुरुवात करतात. ऑगस्टनंतर मात्र हे पक्षी फारसे दिसत नाहीत. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडत असेल त्याच ठिकाणी हे वास्तव करीत असतात.
या पक्षांचे मुख्य खाद्य गांडूळ, किडे आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे या पक्ष्यांची वीण कमी होऊन त्यांची संख्या रोडावल्याचे दिसून येत असल्याची माहिती पक्षीमित्र महेश यांनी दिली.
दरम्यान, या पक्ष्यावर पशुवैद्यांनी उपचार केले असून त्यांच्या सल्ल्यानुसार निरक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या दुर्मिळ पक्ष्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.