नवी मुंबई - हार व फुलांनी सजवलेल्या तुळशी वृंदावनासमोर पाटावर ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती. तुळशी आणि पाट यांच्यामध्ये धरलेला अंतरपाट. मंगलष्टकांचा सुरू असलेला मंगलमय गजर. अन् शुभमंगल सावधानचा गजर उमटताच तुळशी व बाळकृष्णावर अक्षतांचा झालेला वर्षाव. गोरज मुहूर्तावर या मंगलमय वातावरणाने नवी मुंबईतील दुमदुमली होती. निमित्त होते सामूहिक तुळशी विवाह सोहळ्याचे.
आतिषबाजी व जल्लोष करत तुळशी विधीवत पुजण्यात आल्या. यामुळे विवाह सोहळ्याची रंगत द्विगुणित झाली होती. महिलांनी मोठ्या उत्साहात विवाहाचा आंनद साजरा केला. तिन्ही सांजेचा मुहूर्त व मंगलाष्टकांच्या स्वरात बाळकृष्णाच्या प्रतिमेसह तुळशीचे लागलेले लग्न, वऱ्हाडी मंडळींनी तुळस आणि बाळकृष्णाला कवठ, आवळा, चिंच आणि फराळाचा नैवेद्य दाखवत केलेले प्रसाद वाटप करण्यात आला. तुळशीला हिरव्या बांगड्या, आरसा, कापसाचे वस्त्रही वाहण्यात आले, तर बाळकृष्णाच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. लग्नानंतर तुळस आणि बाळकृष्णाची आरती झाली.
गेल्या दहा वर्षांपासून सामूहिक पद्धतीने तुळशीचा विवाह आयोजित करण्यात येत असून नवी मुंबईतील आसपासच्या सोसायटी मधील नागरिक लग्नामध्ये सहभागी होतात. तुळशीचे महत्त्व नागरिकांना समजावे याकरिता माहितीपत्रे वाटप करण्यात येतात.