ठाणे- उल्हासनगर शहरातील खड्डे, कोसळणाऱ्या इमारती आणि वाहतूक कोंडीने नागरिकांना रडकुंडीला आणले आहे. गणेशोत्सवातही या त्रासाचे प्रतिबिंब उमटले आहे. उल्हासनगरमधील कॅम्प चार येथील दिनेश राजपाल यांनी चक्क गणपती बाप्पाकडे साकडं घातलं असून राजपाल कुटुंबियांनी घरच्या गणपती बाप्पासमोर या समस्यांचा देखावा साकारत या विघ्नातून सुटका करण्यासाठी विघनहर्त्याला साकडे घातले आहे.
रस्त्यावरील खड्डयांनी आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले आहेत. अरुंद रस्त्यांमुळे संपूर्ण शहर वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकले आहे. तसेच शहरातील इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसाआड स्लॅब किंवा इमारत पत्त्यांसारखी कोसळून अनेकांचे जीव गेले आहे. त्यामूळे गणपती बाप्पालाही त्याच्या डोळ्यासमोर सतत हेच चित्र दिसत असेल. हा विचार करून आपण हा देखावा साकारल्याचे दिनेश राजपाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. या सर्व संकटातून नागरिकांची सुटका व्हावी आणि उल्हासनगर महापालिकेलाही ती सुबुद्धी सुचावी यासाठी अशा प्रकारे थेट बाप्पांना साकडे घालण्यात आले आहे. यातून आपले राजकारणी आणि प्रशासन बोध घेईल काय? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
हेही वाचा- ठाणेकरांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी बाप्पा अवतरले थेट रस्त्यावर