'ती' इमारत धोकादायक होती, पालिकेच्या नोटीसीकडे रहिवाशांचे दुर्लक्ष - Bhiwandi Municipal Commissioner
आज पहाटे तीनच्या सुमारास भिवंडीत एक इमारत कोसळली. धामणकर नाका, पटेल कंपाउंड परिसरात ही तीनमजली इमारत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठाणे : भिवंडीमध्ये आज पहाटे कोसळलेली तीन मजली इमारत ही धोकादायक होती, तसेच पालिकेने यासंदर्भात दोन वेळा नोटीसही पाठवून ती खाली करण्याचे आदेश दिले होते. अशी माहिती महापालिका आयुक्त पंकज आशिया यांनी दिली आहे.
आज पहाटे तीनच्या सुमारास ही इमारत कोसळली. धामणकर नाका, पटेल कंपाउंड परिसरात ही तीनमजली इमारत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच आम्ही बचावकार्यास सुरुवात केली. भिवंडी पालिकेचे बचाव पथक, ठाणे महापालिकेचे बचाव पथक आणि एनडीआरएफचे पथक यांच्यामार्फत बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली नक्की किती लोक अडकले आहेत याची संख्या सध्या सांगता येणार नाही, मात्र एकूण २५-२६ कुटुंबे या इमारतीत राहत होती. सध्या आम्ही केवळ बचावकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे, तसेच आमच्याकडे पुरेशी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध आहे, अशी माहिती आशिया यांनी यावेळी दिली.