ठाणे - उल्हासनगरातील एका बांधकाम विकासकाने इमारतीचे बांधकाम उभे करण्यासाठी हनुमानाचे मंदिर तोडून या ठिकाणी बांधकाम सुरू केल्याने स्थनिकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिका कॅम्प नंबर 5 प्रभाग समितीच्या अगदी समोरच हे बांधकाम सुरू केले आहे.
उल्हासनगर महापालिका कॅम्प नंबर 5 प्रभाग समितीच्या समोरच बांधकाम विकासक कुमार वाधवा यांनी या जागेत असलेले हनुमान मंदिर तोडून त्याठिकाणी इमारत उभी करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह, ओमी कलानी व राजे प्रतिष्ठान संघटनेला दिली. माहिती मिळताच बजरंग दलचे पीयूष वाघेला, आशीष यादव, बिरजू भोईर व इतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी हे बांधकाम थांबवून बांधकाम करणाऱ्या विकासकाला जोपर्यंत हनुमान मंदिर पुन्हा बांधून देणार नाही. तोपर्यंत इमारतीचे बांधकाम करायचे नाही, असा इशारा दिला. त्यानंतर हनुमान मूर्तीची पूजाअर्चा केली. खळबळजनक बाब म्हणजे या हनुमान मंदिरातील मूर्ती समोरच बियरच्या बाटल्यासह कचरा साठवून ठेवला होता. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आधी मंदिर नंतर इमारतीचे बांधकाम
बांधकाम विकासक कुमार वाधवा यांनी महापालिकेकडून इमारत उभारण्यासाठी परवनगी घेतली आहे. त्यामुळे बांधकाम विकासक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये मंदिर पुन्हा उभारण्याच्या अटीवर चर्चा होऊन हा वाद निवळल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे उल्हासनगरात भूमाफियांनी टाळेबंदीच्या काळात बेकायदा बांधकामाचा सपाटा लावल्याचे महापालिकेला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून दिसून आले आहे.
हेही वाचा - दुचाक्यांच्या हौसेपाई पोहचले कोडठीत; बनावट चावीने लंपास करायचे बाईक