ठाणे - सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांवर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी सर्व महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे लावले होते. येत्या 8 जानेवारीला भाजप सरकारच्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने यावेळी स्पष्ट केले आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ८८ हजार अंगणवाडी सेविका, १३ हजार मिनी सेविका आणि ८७ हजार मदतनिस असे मिळून सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी काम करत आहेत. तसेच, देशात सुमारे २८ लाख अंगणवाडी कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना शासन शासकीय कर्मचारी मानत नाही. सेविकेला ८५०० रूपये, मिनी सेविकेला ५७५० रूपये आणि मदतनिसला ४२५० रूपये दरमहा मानधन दिले जाते. या योजनेत काम करणाऱ्या इतर सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना शासकीय दर्जा दिला गेला आहे. फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानसेवी असे नाव देऊन अल्पशा मानधनामध्ये त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे. सामाजिक सुरक्षिततेचे कोणतेही फायदे त्यांना दिले जात नाहीत. शासनाकडून वर्षानुवर्षे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेठबिगारासारखी वागणूक दिली जात आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - गडचिरोलीमध्ये उभी राहिली 'हिरवी क्रांती'; कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाड्यांच्या माध्यमातून अनोखा उपक्रम
राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१९ पासून मानधन मिळालेले नाही. तातडीने मानधनाची रक्कम देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची होत असलेली उपासमार थांबवण्यात यावी तसेच, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेविकेला तृतीय श्रेणी तर मदतनिसला चतुर्थ श्रेणीचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच, मानधनात वाढ करण्यात यावी, सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळत असलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची रजा मिळावी, लाभार्थ्यांच्या आहाराचे पैसे आगाऊ द्यावे, आशा विविध मागण्या केंद्र व राज्य सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.