ठाणे - येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य विक्रांत चव्हाण यांनी बुधावरी मुंबईतील एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर त्यांनी आज ठाण्यात आपली बाजू मांडली. ते म्हणाले, मी मोबाईलवर हात मारला पण, तो व्हिडिओ अर्धवट आहे. त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
आपण व्यक्तिगत कारणासाठी मेट्रोने प्रवास करत असता, परतीचे टोकन मशीनमध्ये अडकल्याने आपल्याला मनस्ताप सहन करावा लागला. पण, आपण आपली ओळख सांगताच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आपले हे संभाषण सुरु असताना एक अनोळखी महिला मोबाईलवर आपल्या परवानगीशिवाय चित्रीकरण करत असल्याचे पाहून आपण तसे करण्यास मज्जाव केल्याचे नगरसेवक विक्रांत चव्हाण म्हणाले.
त्या महिलेचा मोबाईल सारखा आपल्या चेहऱ्यासमोर येत असल्याने आपण तो बाजूला केला. परंतु, त्याचे भांडवल करत त्या महिलेने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंट तसेच इंस्टाग्रामवरून व्हायरल केला. ज्यावर तिच्या फॉलोवर्सने अर्वाच्च भाषेत झोड उठवली. त्या ट्वीटमध्ये विक्रांत चव्हाण यांचा उल्लेख ठाण्याचे दिवंगत बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी असा केल्याने आपली बदनामी झाली असून आपण त्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ती महिला, पत्रकार असल्याचे कळल्यावर विक्रांत चव्हाण यांनी तो मजकूर त्वरित हटवावा, अशी मागणी त्या महिलेकडे केली आहे.