नवी मुंबई - तळोजा औद्योगिक वसाहतीत पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी अनधिकृतपणे प्लांट उभारून त्यामार्फत अनधिकृतपणे केमिकल गाळाचे विघटन करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश युवा सेनेने केला आहे. यासंदर्भाची माहिती युवा सेनाप्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना युवासेनेने पाठवली आहे.
प्लांट हा धरमभाई नावाची व्यक्ती चालवित असल्याची माहिती परिसरातील लोकांकडून युवा सेनेचे सहसचिव रूपेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व सदर प्लांटला भेट दिली असता तेथे असलेले कामगार व इतर कर्मचारी पळून गेले. तपासणीत संंबधीत ठिकाणी बेकायदेशीर काम होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या काही गाड्या तळोजा परिसरात बेकायदेशीररित्या फिरत असून या गाड्यांवर प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पुराव्यासह पाठविल्याचे रूपेश पाटील यांनी सांगितले आहे. तरी संबंधित विभागाने सदर प्लॅंटसह नियम ढाब्यावर बसविणाऱ्या सर्व कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.