ठाणे : Thane Runover Case : प्रेयसीला कारखाली चिरडल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अश्वजीत गायकवाडसह त्याच्या दोन साथीदारांना रविवारी रात्री अटक करण्यात आली होती. या सर्वांना सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळं लगेच जामीनासाठी आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तर न्यायालयानं या सर्वांना जामीन मंजूर (Ashwajit Gaikwad Bail Grants) केला आहे.
रविवारी तिघांना केली होती अटक : प्रियकर अश्वजीत गायकवाड यानं प्रेयसीला कारखाली चिरडल्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित प्रेयसीनं केला होता. हा सर्व प्रकार 11 डिसेंबरच्या पहाटे ठाण्यातील घोडबंदर परिसरात झाल्याचा दावाही तिनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना रविवारी ठाणे पोलिसांच्या 'एसआयटी'नं अटक केली होती.
काय झाला युक्तिवाद : सर्व आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करायची आहे. त्यामुळं या आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. तसेच एफआयआर नीट लिहिली नाही. पीडितेला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. तसंच कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळं निवेदन पुन्हा नोंदवावे, अशी मागणी पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. तर 307 आणि 376 चे कलम दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती पीडितेच्या वकिलांनी दिली.
पीडितेच्या वकिलांची प्रतिक्रिया : या प्रकरणात पोलिसांवरती राजकीय दबाव होता. ज्यावेळेला पीडितेचा पोलिसांनी जबाब नोंदवला, त्यावेळेला पीडिता पूर्णपणे शुद्धीवरती नव्हती, तरी देखील तिचा जवाब नोंदवण्यात आला. ठाणे पोलिसांनी अश्वजीत व त्याच्या साथीदारांवर जामीनपात्र गुन्हे दाखल केल्याने अश्वजीतला जामीन मिळण्याची शक्यता आधीच वर्तवली होती. पीडिताने पोलिसांकडे ३०७ चा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप पीडितेचे वकील बाबा शेख यांनी केला आहे. ३०७ आणि ३७६ चे कलम दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचे देखील पीडितेचे वकील बाबा शेख यांनी सांगितलं.
काय आहे घटना? : पीडितेनं सांगितल्यानुसार, मी प्रियकराला भेटायला गेली होती. तेव्हा तो त्याच्या पत्नीसोबत सापडला. जेव्हा तिनं त्याला यावरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी आक्रमक झाला आणि नंतर त्यानं त्यांच्या एसयूव्ही कारनं मला चिरडण्याचा प्रयत्न केला. आरोपीसोबत माझे साडेचार वर्षांपासूनचे संबंध होते, असा दावाही पीडितेनं केला आहे. ही घटना सोमवारी पहाटे ठाण्यातील एका हॉटेलजवळ घडली. या प्रकरणात डीसीपी झोन ५ अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अश्वजित गायकवाड आणि इतरांना आरोपी बनवण्यात आलं होतं. झालेल्या प्रकारानंतर पीडितेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यायाची मागणी केली.
हेही वाचा -