ठाणे - शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत 19 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, आज काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळले. ठाणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना रस्त्यावरच बसवून ठेवले.
ठाण्यात आजपासून आणखी 19 तारखेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. पोलिसांना मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळी नाका इथे काहीजण फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना काही वेळासाठी पकडून रस्त्यावर बसवून ठेवले. त्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून दिले. या लोकांना बाहेर पडायचे कारण विचारले असता त्यांनी भाजीपाला दूध अशा जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले.
दहा दिवस घरातच थांबलेल्या ठाणेकरांना आता जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने लॉकडाऊन वाढवण्या अगोदर या गोष्टीचा देखील विचार करायला हवा होता,असे नागरिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे उत्पन्न नाही आणि दुसरीकडे वाढणारा लॉकडाऊन त्यामुळे दुहेरी कात्रीमध्ये सापडलेल्या नागरिकांना घरातील साहित्यासाठी नाईलाजस्तव बाहेर पडावे लागत आहे आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.