ठाणे Thane Crime News : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या सोनसाखळी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ ने धडक कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके याना मिळालेल्या माहितीच्या आधारे, इंदिरानगर ठाणे येथून आरोपीला अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत १४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस पथकाला यश आलं आहे. या गुन्ह्यात १२ गुन्हे सोनसाखळी चोरीचे, एक गुन्हा चिटिंगचा आणि एक वाहन चोरीचा असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी दिलीय. अटक आरोपींकडून ५ लाख ४० हजार रुपये किंमतीचे १४१ ग्रामचे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
१४ दाखल गुन्ह्यामध्ये १२ सोनसाखळी चोरीचे : अटक आरोपी असिफ शब्बीर सैय्यद (६२) राहणार पाटील नगर गल्ली नं ४, आंबवली आणि आरोपी बागर आसिफ सैय्यद (३८) राहणार भास्कर शाळेच्या बाजूला, कुरम चाळ, आंबिवली यांचा समावेश आहे. असिफ आणि बागर दोघे बाप लेक आहेत. त्यांच्यावर ठाणे परिसरात चितळसर, कापूरबावडी, ठाणे नगर, वागळे, श्रीनगर, आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. १४ दाखल गुन्ह्यामध्ये १२ सोनसाखळी चोरीचे तर चीटिंग आणि वाहन चोरीचा प्रत्येकी एक गुन्हाचा समावेश आहे.
एका आरोपीला न्यायालयीन कोठडी : सोनसाखळीचे गुन्हे श्रीनगर पोलीस ठाण्यात, ३ गुन्हे वागळे पोलीस ठाण्यात, ३ गुन्हे ठाणे नगर आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा, चितळसर पोलीस ठाण्यात ४ गुन्हे, कापूरबवाडीत २ गुन्हे तर एक चिटिंगचा श्रीनगर पोलीस ठाणे आणि एक वाहन चोरीचा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात असे १४ गुन्ह्यांचा समावेश आहे. सदर अटक चोरट्यापैकी आरोपी असिफ याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेले आहे. तर आरोपी बागर हा पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याची अधिक चौकशी सुरु आहे. सदर आरोपींवर पूर्वी अनेक सोनसाखळीचे गुन्हे दाखल असल्याने, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा मानस पोलिसांचा असल्याची माहिती, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी दिलीय.
सोनसाखळी चोरटे बाप-लेक सराईत गुन्हेगार : गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने अटक केलेल्या आरोपी असिफ शब्बीर सैय्यद आणि त्याचा मुलगा बागर आसिफ सैय्यद हे सराईत सोनसाखळी चोरटे असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर यापूर्वीचे २३ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आरोपी असिफ याच्यावर १८ सोनसाखळी चोरीचे गुन्हे तर मुलगा बागर ५ सोनसाखळी चोरीचे गुन्हे मुंबईच्या सांताक्रूझ, मीरारोड, भायंदरसह विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.
हेही वाचा -