ठाणे - कल्याणच्या पोलिसांनी अंमली पदार्थांचे राजस्थान ते कल्याण कनेक्शन तोडण्यात यश मिळवले आहे. राजस्थानहून कल्याणमध्ये अफीम नावाचा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आणून तो इतरत्र वितरित करण्याच्या तयारीत असलेल्या तिघा तस्करांचा मनसुबा बाजारपेठ पोलिसांनी उधळून लावला.
या त्रिकुटाकडून 5 लाख 22 हजार रुपये किमतीचे अफीम हस्तगत करून अंमली पदार्थ तस्करीचा कणा मोडून काढला आहे. सुरेश नारायणलाल कुमहार (वय 22, ) सोमनाथ प्रल्हादजी प्रजापती ( वय 32), भरत गंगाराम चौधरी (वय 22) राहणार जाल्होर, राजस्थान, असे त्रिकुटाचे नावे आहे. तर सुरेश कुमहार हा तस्कर भिवंडीतील शिवाजी चौक येथे असलेल्या पटेल बिल्डींगमधील एका किराणा दुकानात नोकरी करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलैला बाजारपेठ पोलिसांच्या ठाणे प्रकटीकरण पथकातील सचिन साळवी व नितीन भोसले यांना काही व्यक्ती अंमली पदार्थांची तस्करी करून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदशनानुसार पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. सानप यांच्यासह टि. के. पावशे, नितीन भोसले, सचिन साळवी, सबीर शेख ,जी एन पोटे, राजाराम सांगळे या पोलीस पथकाने गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात सापळा लावला होता. अर्धा-पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर जुन्या दुर्गाडी पुलावरून दुर्गाडी किल्ल्याच्या चेकपोस्टकडे दुचाकीवरून आलेल्या या त्रिकुटाला पोलिसांनी पकडले.
त्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 1 किलो 40 ग्रॅम वजनाचे अफीम आढळून आले. या तस्करांकडे अधिक चौकशी केली असता हे अफीम राजस्थान येथून वाहतूक करून कल्याण शहरात विक्रीसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पाकिस्तानातून राजस्थान मार्गे आणले जात असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. या अंमली पदार्थांची किंमत 5 लाख 52 हजार रुपये इतकी असून बाजारात ते पाचशे रुपये प्रति ग्रॅम या भावाने विक्री करत असल्याचे तस्करांनी सांगितले.
या त्रिकुटाच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 विविधकलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.