ठाणे - प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात केंद्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी रँकिकमध्ये ठाणे महापालिका ५७ व्या क्रमांकावर घसरली आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे महापालिकेच्या वतीने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत ठाणे महापालिका पिछाडीवर पडल्याने ही घसरण झाली आहे. एकूण ३ हजार ७०० कोटींच्या क्लस्टर योजनेचा समावेश स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला असल्यानेच हा रँक घसरला आहे, असा युक्तिवाद आता पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत अनेक महत्वाकांशी प्रकल्पांची घोषणा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पना स्मार्ट मिशन अंतर्गत निधी मिळणार असून हे सर्व प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र, जे प्रकल्प खासगी लोकसहभागातून करण्यात येणार आहे, त्यांना शासनाचा निधी उपलब्ध नाही. यामध्ये क्लस्टर योजनेचादेखील समावेश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ज्यांना निधी उपलब्ध आहे त्या प्रकल्पांच्या निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्प अंमलबजावणीच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे या सर्व्हेचा नियम सांगतो. क्लस्टर योजनेचे युआरपी प्रसिद्ध करण्यात आला असून युआरपीचा निविदांमध्ये समावेश होत नसल्याने हा रँक घसरला असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
स्मार्ट सिटीमध्ये देशभरातून निवड करताना ठाणे शहराला पहिल्या दोन यादीमध्ये स्थान मिळाले नव्हते. २०१६ मध्ये ठाणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये मिशनमध्ये तिसऱ्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. या योजनेस ५ हजार ५०५ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून यामध्ये १ हजार कोटींच्या प्रकल्पना केंद्रा शासन, महापालिका निधी देणार आहे. तर उर्वरित प्रकल्प खासगी लोकसहभागतून केले जाणार आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात झालेल्या केंद्र शासनाच्या सर्व्हेमध्ये मात्र ठाणे महापालिका ५७ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मात्र, हे सर्वेक्षण अंतिम नसून येत्या २५ किंवा २६ फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात येणाऱ्या रँकमध्ये ठाणे महापालिका आघडीवर असेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यातला आहे.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ४२ प्रकल्पांची आखणी केली असून ४१ प्रकल्पांच्या डीपीआरला मान्यता मिळाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. याशिवाय ३८ प्रकल्पांची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून या प्रकल्पांच्या कामाचे कार्यादेश देखील देण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेमध्ये क्लस्टर योजनेचा समावेश केला असल्याने आणि सर्वाधिक म्हणजे ३ हजार ७०० चा निधी यासाठी प्रस्तावित असल्याने अंमलबजावणीच्या बाबतीत ७५ टक्के परिणाम क्लस्टर योजनेचा असल्याने हा रँक घसरला असल्याचे प्रशासनाचे स्पष्ट केले आहे.
प्रकल्पांची सध्यस्थती -
स्मार्ट सिटीच्या एकूण प्रकल्पांची संख्या - ४२
एकूण प्रास्तवित निधी - ५५०५.८५ कोटी
डीपीआरला मान्यता मिळालेले प्रकल्प - ४१
निविदा काढण्यात आलेले प्रकल्प -: ३८
कार्यादेश देण्यात आलेले प्रकल्प -: ३४
पूर्ण करण्यात आलेले प्रकल्प - ५
निधीचे स्रोत -
स्मार्ट सिटी मिशन : ९४९ कोटी
दळणवळण मंत्रालय . २३९ कोटी
ठाणे महापालिका : ९० कोटी
खासगी लोकसहभागातून ३९७४ कोटी