ठाणे - महापालिका आयुक्तांच्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या एका आक्षेपार्ह संदेशाचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले आणि सभा अर्धा तास तहकूब झाली. तर, आता महापालिकेतील अंतर्गत बदल्यांवरून पेटलेला वाद चिघळण्याची शक्यता आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून संतप्त झालेल्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या अधिकृत ग्रुपवर आपला राग व्यक्त केला होता. हा राग व्यक्त करताना अधिकाऱ्यांच्या कुटुंबियातील महिलांबद्दलही आयुक्तांनी अपशब्दाचा वापर केल्याने वादंग उठला. यावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा नेमका अर्थ काय, हे सभागृहाला समजले पाहिजे, अशी मागणी भोईर यांनी केली. ज्या ग्रुपवर महिला अधिकारीही आहेत त्या ग्रुपवर एखाद्या अधिकाऱ्याच्या आई-बहिणींविषयी असे विधान करणे योग्य नसल्याचे सांगत या प्रकाराचा त्यांनी निषेध केला.
हेही वाचा - 'शाहीन बाग'मध्ये तिरंग्यासह भगवे झेंडे, शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनीही याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी पालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांना असा काही प्रकार झाला आहे का, याचा खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिका सचिव बुरुपल्ले यांनी या प्रकाराला दुजोरा देत याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. अखेर, सभागृहातील महिला नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली. दरम्यान, महापालिकेतील अंतर्गत बदल्यावंरून पेटलेला वाद आता शिगेला पोहचला असून आयुक्त विरुद्ध नगरविकास मंत्री अशी लढाई रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा - भिवंडीत 'तिहेरी तलाक'चा चौथा गुन्हा दाखल, हुंड्यासाठी दिला तलाक