ठाणे - लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलाबाबत सवलत न देता यू-टर्न घेणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार काल (बुधवार) उल्हासनगर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस उपायुक्त धुळा टेळे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिल कमी व्हावे यासाठी मनसेने या पूर्वी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार केला होता. तर काही शहरात मनसे कार्यकर्त्यांनी खळ्ळखट्याक आंदोलन देखील केले होते. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही वाढीव वीज बिल मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. तरीही सरकार यू-टर्न घेत असल्याने उल्हासनगर शहरात मनसेने तक्रार दाखल केली आहे. वीजवितरण कंपनीने जर ग्राहकांच्या वीज मीटरला हात लावला तर मनसे स्टाईलने उत्तर देणार असल्याचा इशारा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मनसेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला आहे.