ठाणे - येथे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असून आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. एकीकडे ही दिलासादायक परिस्थिती असून ग्लोबल रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ग्लोबल रुग्णालय म्हणजे रुग्णांसाठी एकप्रकारे जीवनदान ठरत आहे, असे मत ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केले आहे. ग्लोबल रुग्णालयात कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात सर्वांनी मिळून एकतरी काम केले पाहिजे, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. असे असताना काही महिन्यांपूर्वी ठाण्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. यानंतर बाळकुम येथे ग्लोबल रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती. याच रुग्णालयात सुरुवातीच्या काळात 1 हजार 800 बेड ठेवण्यात आले होते. मात्र, आता 4 हजार 800हुन बेडमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी स्वच्छता, रुग्णांसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ग्लोबल रुग्णालयाची एकही तक्रार येत नसल्याचे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.
ठाण्यात नव्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने खाली येताना दिसत आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर, म्हणजे रिकव्हरी रेट वाढताना दिसून येत आहे. रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी सातत्याने वाढत आहे. ऑक्सिजन, कोरोनाच्या रुग्णांना लागणारी औषधांचीदेखील कमतरता नाही. ठाण्यात मृत्यूदर कमी करण्यात आपण यश मिळवले असल्याचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महापालिका प्रशासन यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ग्लोबल हॉस्पिटल हे असे एकमेव रुग्णालय असून याठिकाणी रुग्णांसाठी एकप्रकारे जीवनदान ठरत असल्याचे मत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केले.
ग्लोबल मधे येत आहेत राज्यभरातून रुग्ण -
या रुग्णालयात रायगड कल्याण, डोंबिवली, मीरा-भायंदर, पुणे आणि आणखी ही विविध शहरातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. याठिकाणी जवळपास 35 टक्के रुग्ण ठाण्याबाहेरुन उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयाच्या खाली 24 तास मेडिकल सुरू आहे. याठिकाणी रेमडेसिविर टॉक्सिन हे औषध उपलब्ध करुन दिले जाते.