ठाणे : सध्या राज्यात निवडणुकांच्या तयारीसाठी शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार देणार नसून या दोन्ही जागा ठाकरे गटाला देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. येणाऱ्या निवडणूका दोन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याने काही मतदार संघ एकमेकांना सोडण्याची तर काहींची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्याच अनुषंगाने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघ उद्धव गटाकडे गेला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे असे संकेत खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी झालेल्या बैठकीत दिले आहेत.
ठाकरे गट विरुद्ध डॉ. श्रीकांत शिंदे : कर्नाटकच्या विधानसभा निकालाने विरोधी पक्षांना वेगळीच स्फूर्ती मिळाली असून लोकसभेसाठी विरोधक मोर्चेबांधणी करत आहे . प्रत्येक पक्ष मतदारसंघ निहाय आढावा घेऊन जागा निश्चित करताना पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण लोकसभेची जागा आता जास्त चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी या दोन्ही जागा ठाकरे गटाला देत असून कल्याण लोकसभेत ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे.
सुभाष भोईर दावेदार ? : २०१९ च्या निवडणुकीत कल्याण लोकसभेसाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील अशी लढत झाली होती. तर ठाणे लोकसभेत ठाकरे गटात असलेले राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे अशी लढत पाहायला मिळाली होती. या अनूशंगाने ठाणे लोकसभेच्या जागेवर विद्यमान खासदार राजन विचारे दावेदार ठरू शकतात, तर कल्याण मध्ये ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा अध्यक्ष सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा सुरु आहे बॅनरवर सुभाष भोईर यांचा थेट भावी खासदार असा उल्लेख केल्याने कल्याण लोकसभेसाठी सुभाष भोईर हे दावेदार ठरू शकतात.
राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना : कल्याण लोकसभा मतदार संघ २००८ साली अस्तित्वात आल तेव्हापासुन या मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे . या मतदार संघात आतापर्यंत शिवसेनेकडून एकदा आनंद परांजपे तर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोनदा विजय मिळवला आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीचं दुसरं समीकरण पाहिले तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे त्यांचा मतदारसंघ सोडून ठाणे मतदार संघावर जास्त लक्ष केंद्रित करतांना पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदेंचा गड काबीज करण्याचा प्रयत्न : ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असला तरी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या विरुद्ध तगडा उमेदवार मिळत नाहीये. त्यामुळे ठाणे मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे. श्रीकांत शिंदे हे जर ठाणे मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असतील तर ती जागा भाजपकडे जाऊ शकते. कारण भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप फडणवीस विरुद्ध तिन्ही पक्ष ताकद लावत असतांना मुख्यमंत्री एकनाथ हे दोन्ही मतदार संघ टिकून ठेवता येतील यासाठी समीकर जुळवत आहेत.