ठाणे - राज्य सरकारने आजपासून हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यासाठी नियम आणि अटींसह परवानगी दिली आहे. पण, हा आदेश ठराविक मोठ्या हॉटेल्सलाच उपयुक्त आहे. लहान हॉटेल व्यावसायिकांना नुकसानदायक असल्याचे ठाणे हॉटेल असोसिएशनला वाटत आहे. देशाचा महसूल आणि रोजगार देणारा हा व्यवसाय आता मोठ्या अडचणीत आहे. करोडो रूपये कर स्वरुपात देवूनही सरकार याबाबत काही ठोस उपाययोजना करत नसल्याचे असोसिएशनने सांगितले आहे.
कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, लॉज यांना नियम पालन आणि क्षमतेच्या 33 टक्के क्षेत्राच्या वापराची अट घालून परवानगी देण्यात आली आहे. ठाण्यात 40 ते 50 रूमपेक्षा जास्त कोणत्याच हॉटेलकडे नाही. त्यातही छोटे-छोटे व्यावसायिक आहे, त्यांना या नियमाने होटेल सुरू करायचे झाल्यास त्यांचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था होणार आहे. त्यामुळे 60 टक्के खोल्या चालू करण्याचे आदेश आले तरच हा व्यवसाय तग धरू शकतो, असे सर्व हॉटेल व्यावसायिक सांगतात.