ठाणे : मनसेबरोबरच महेश कदम यांनी स्वामी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य केले आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच कदम यांनी २०१७ मधील महापालिकेची निवडणुकही लढविली होती. आज झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक फळी आणखी मजबूत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या काही तासांपूर्वी माझा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. याबद्दल मी भाग्यवान आहे. सध्याच्या परिस्थितीत हिंदुत्वाचा केंद्रबिंदू हा भाजपच आहे. ते लक्षात घेऊन भाजपमध्ये सहभागी झालो, अशी प्रतिक्रिया महेश कदम यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यासह महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मनसेतील अनेकजण नाराज: मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी करोडो रुपयांची ऑफर येऊनही महेश कदम यांनी पक्ष सोडला नव्हता. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग सोबत असल्यामुळे त्यांनी पक्षासोबत काम करणे पसंत केले. मात्र काही मतभेदामुळे त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
समान नागरी कायद्यासाठी ठाकरेंचा आग्रह: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी 12 एप्रिल, 2022 रोजी ठाण्यात सभा घेतली होती. मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचे नव्हते म्हणून मी सभा घेतली. एक समान नागरी कायदा आणावा आणि लोकसंख्या वाढीवर एक कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली होती. ते ठाण्यातील 'उत्तर' सभेत बोलत होते.
गृह विभागाला अलटीमेटम: 3 मे पर्यंत भोंगे उतरावा नाहीतर हनुमान चालीसा सुरूच राहील. 3 तारखेला ईद आहे माझे राज्य सरकारला आवाहन आहे. महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडवायचे नाही सर्व मशिदी वरील भोंगे खाली घ्या. नंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज ठाकरे यांनी गृह खात्याला डेड लाईन देऊन स्पष्ट केले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची किव करावी अशी वाटते असेही ते म्हणाले होते. देशातील प्रामाणिक मुसलमान भरडला जात आहे. 95 टक्के हिंदू वस्तीतून सलीम मामा निवडून येतो. पण यांच्यामुळे तो भरडला जातो, अशी भावनाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.
टीकाकारांचे वाभाडे काढले: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी शिवतीर्थावर केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यासह अनेकांनी टीका केली होती. त्या सर्वांचा समाचार घेण्यासाठी तसेच उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 'उत्तरसभा' मंगळवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील डॉ. मूस रोडवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्यावरून टीकेचे आसुड ओढत टीकाकारांचे वाभाडे काढले.