ठाणे - भिवंडीच्या सारवली येथील मे. फेबिना टेक्सटाईल्स कंपनीचे मालक रवी मोहनलाल भालोटिया यांना ठाणे जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत २ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. भालोटिया यांच्यावर विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार दोषी ठरवून ३ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. दंडाची रक्कम भरल्यास आरोपीला एक वर्षाची साधी कैद असा निर्णय दिला. तर वीज चोरीचा सल्ला देणाऱ्या विद्युत कंपनीच्या दोन अभियंत्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपी रवी मोहनलाल भालोटिया यांनी ८५ लाख ७५ हजार ५९९ रुपये विद्युत कंपनीला देण्यात यावेत तसेच तपास यंत्रणांनी आरोपी भालोटियावर लावलेले आरोपही सिद्ध केले आहेत. त्यामुळे शिक्षा ठोठावणे गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने मांडले.
वीजचोरी प्रकरणात विशेष सरकारी वकील विवेक कडू यांनी न्यायालयाला सांगितले कि, 2003 साली विद्युत कंपनीच्या इंजिनियर यांनी मेसर्स फेबिना टेक्सटाईल्स लि. सरवली, भिवंडी याची पाहणी केली. पथक मीटर रूम येथे गेले. त्याठिकाणी एक व्यक्ती उपस्थित होती. पथक खिडकीतून आत मध्ये गेल्यानंतर तो माणूस पळून गेला. त्याने वीज मीटरला चुंबक लावलेले होते. ते घेऊन अज्ञात व्यक्ती पळाला. दरम्यान त्याने चुंबक हे गटारात टाकून निघून गेला. वीज पथकाने त्याचा पाठलाग केला मात्र तो सापडला नाही. या प्रकरणी शांतीनगर पोलीस घटनास्थळी आले. तेव्हा चुंबकाच्या सहाय्याने वीज चोरी करीत असल्याचे समोर आले. वीजमीटरची एमआरआय तपासणी केली असता ३२ लाख ७२हजार १२५ वीज युनिट जून २००१ पर्यंत चोरी केल्याचे समोर आले. ही वीजचोरी १ कोटी ४३ लाख १५ हजार ५५० एवढी होती.
पुरावे गृहीत धरले
न्यायालयासमोर सादर पुरावे ग्राह्य धरीत ठाणे जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी आपल्या निकालात स्पष्ट केले कि, आरोपी भालोटिया यांच्या विरोधात विद्युत कायदा कलम १३५ अनुसार शिक्षेची तरतूद आहे. अशा वीजचोरीच्या प्रकरणात कंपनीच्या आर्थिक लाभाच्या तीनपट पेक्षा कमी नसावे. दरम्यान या प्रकरणात ८५ लाख ७५ हजार ४३५ वीजचोरीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. तर यापूर्वीच ४२ लाख ७० हजार २३२ युनिट ची रक्कम २ कोटी २ लाख ८४ हजार रुपयांचा गुन्हा आरोपीवर दाखल आहे. न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने के. टी. अन्सारी यांनी युक्तिवाद केला. मात्र अन्सारी यांनी न्यायालयाच्या मर्यादा ओलांडल्या. अन्सारी यांनी खटला चालविण्यात घाई करू नये असे निवेदन करीत न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तर विद्युत कंपनीचे साक्षीदार हरी विठ्ठल धावरे सेवानिवृत्त इंजिनियर आणि सहाय्यक इंजिनियर ए. डी. भालशंकर यांनी आरोपीला मदत केली. सेवेत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरही हे इंजिनियर कंपनी मालकांसाठी मदत करीत होते. तेव्हा त्यांच्या विरोधात रीतसर कारवाई करावी असे स्पष्ट मत न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी निकालात व्यक्त केले.