ठाणे - संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक पेचप्रसंग उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) आपल्या खातेदारांच्या मदतीसाठी धावून आली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने 31 मार्चपर्यंत परतफेड करावी लागणाऱ्या सर्व कर्जदारांना तीन महिन्यानंतर म्हणजेच 30 जून 2020 पर्यंतची मुदतवाढ सवलत जाहीर केली आहे. याचा लाभ बिगरशेती संस्था, मच्छीमार, शेतकरी व इतर कर्जदार सदस्यांना होणार आहे.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक असून ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यात बॅंकेच्या तब्बल 113 शाखा आहेत. या शाखांमार्फत दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पीक कर्ज देण्यात आले आहे. शिवाय मच्छिमार, बचत गट, बिगरशेती सहकारी संस्था आणि सदस्यांना गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज दिले आहे. या मध्यम मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2020 होती. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत असून आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तातडीने संचालक मंडळाची बैठक बोलावून या कर्जाची परतपेढीची मुदत 30 जून 2020पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने कर्जदारांना हप्ते भरण्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.