ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर एका दुचाकीस धक्का लागल्याच्या रागातून दुचाकीवरील तिघांनी ट्रेलरमधील केमिकल पावडरच्या गोणी फाडून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. संबंधित केमिकल टायर निर्मितीसाठी वापरण्यात येत असून या प्रकारामुळे तब्बल दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी ट्रेलर चालकाने पडघा पोलिसांकडे या तीन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ट्रक ड्रायव्हर अमर प्रेमचंद राकेश त्यांच्या ट्रेलरमध्ये उरण, न्हावाशेवा येथून टायर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर घेऊन ग्वाल्हेरला जात होता. यावेळी मुंबई-नाशिक महामार्गावरील भोइरपाडा हद्दीत शेवय्या ढाब्याजवळ ट्रेलरचा एका दुचाकीला धक्का लागला. याचाच राग मनात ठेवून दुचाकीवरील तिघांनी ट्रेलरला अडवून त्याच्या काचा फोडल्या. यानंतर त्यांनी ट्रेलरमधील गोणी फाडून नुकसान केले.
या घटनेप्रकरणी ट्रेलर चालकाने पडघा पोलिसांकडे अॅक्टिव्हा दुचाकीवरील तीन अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवली आहे. आयपीसी कलम 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.