ठाणे : पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या एका 42 वर्षीय व्यक्तीला कॉलगर्लचा नाद जीवावर बेतला आहे. दोन कॉलगर्लने चोरीच्या उद्देशाने त्यांच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केली.
एक आरोपी फरार : ही घटना बापगांव गावातल्या मल्हारनगर येथील एका चाळीत घडली आहे. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून दोन कॉलगर्लसह त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिवानी जगताप (वय २४) आणि भारती कोमरे (वय ३०) असे अटक केलेल्या कॉलगर्लची नावे आहेत. संदीप पाटील असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवा रॉय हा आरोपी फरार आहे. या चौघांनी मिळून दीपक कुऱ्हाडे (वय ४२) या व्यक्तीची हत्या केली.
चौघांनी मिळून केली हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक दीपक हा गेल्या चार वर्षांपासून पत्नीपासून विभक्त राहत होता. तीन वर्षांपूर्वी त्याची ओळख कॉलगर्ल शिवानीशी झाली. तो तिला कॉल करून स्वत:च्या घरी बोलवत असे. मध्यतंरी शिवानीने दीपकच्या घरी येणे बंद केल्याने दीपकने तिला कॉल करून शिवीगाळ केली होती. याच राग धरून तिने बॉयफ्रेंड संदीप, मैत्रीण भारती आणि तिचा बॉयफ्रेंड देवा यांच्या मदतीने दीपकच्या घरातील ऐवज आणि रोकड लुटण्याचा कट रचला. त्यानंतर ३० जून रोजी दीपकने शिवानीला कॉल केला. तेव्हा शिवानी आपल्या मैत्रिणीसह त्याच्या घरी पोहचली. त्या रात्री दोघींनीही त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्यांनी आपल्या बॉयफ्रेंडला बोलावले. या चौघांनी मिळून दीपकची चाकूने गळा चिरत हत्या केली.
पुढील तपास सुरू : २ जुलै रोजी दीपकच्या आईने दीपकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दीपकची मुलगी त्याच्या घरी गेली. तेव्हा तिला घडलेला सर्व प्रकार दिसला. घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज आणि मृतकच्या मोबाईल नंबरच्या आधारे आरोपी शिवानीला उल्हासनगर येथून ताब्यात घेतले. तिची अधिक चौकशी केली असता तिने इतर तीन साथीदारांसह हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर ४८ तासातच पोलिसांनी आरोपी संदीप आणि भारतीला अटक केली. तर आरोपी देवा अद्यापही फरार आहे. दोन आरोपी कॉलगर्लला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी संदीपच्या पोलीस कोठडीत 13 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा :