ठाणे Thane Crime : अश्लील बोलणाऱ्या दिराची शहापूर तालुक्यातील नेवरे गावाच्या हद्दीत असलेल्या कातकरी वाडीत हत्या झाली. याप्रकरणी गावच्या पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात खून करणाऱ्या बाप लेकावर हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. मधुकर गोविद जाधव आणि विष्णू मधुकर जाधव असे अटक केलेल्या बाप-लेकाची नावे आहेत. राम मधुकर जाधव ( वय ३५) असे खून झालेल्या दिराचे नाव आहे.
पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी मधुकर हे शहापूर तालुक्यातील नेवरे गावाच्या हद्दीत असलेल्या कातकरी वाडीत कुटूंबासह राहतात. त्यांना बंडू , विष्णू आणि राम अशी तीन मुले आहेत. यापैकी एक मुलगा त्याच्या सासुरवाडीला राहत आहे. तर आरोपी विष्णू आणि मृतक राम हे वडिलांसोबत कातकरी वाडीत राहतात. त्यातच १६ संप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मधुकर यांचा मृतक मुलगा राम हा दारू पिऊन घरी आला असता, वडिलांचा त्याच्यासोबत वाद होऊन जोरदार भांडण झाले. या भांडणांचा आवाज ऐकून गावातील पोलीस पाटील तुकाराम शंकर निपुर्ते हे घटनास्थळी आले. त्यांनी दोघा बाप लेकामध्ये सुरू असलेले भांडण सोडवून शांत केले.
लाकडी दांडक्यानं जबर मारहाण- त्याच रात्री आरोपी विष्णूची बायको कांता हिने दीर राम याला जेवणाचा आग्रह केला होता. मात्र जेवण सोडून उलट वहिनीलाच त अश्लील शब्द बोलला होता. मात्र हा अश्लील शब्द आरोपी बाप मधुकर आणि भाऊ विष्णूने ऐकल्यानं या दोघांनी मिळून त्याला लाकडी दांडक्यानं जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर त्या दोघांनी त्याला नजीक असलेल्या आगई येथील शासकीय आरोग्य केंदात उपचारासाठी दाखल केले. मात्र येथील डॉक्टरने रामला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर रामचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी शहापूर उप जिल्हा रुग्णालयात रवाना केला.
५ दिवसांची पोलीस कोठडी- पोलीस पाटील तुकाराम शंकर निपुर्ते यांनी शहापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी बाप लेकावर भादंवि कलम ३०२, आणि ३४ प्रमाणे १७ सप्टेंबर रोजी पोलीस पाटील निपुर्ते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या दोघा बाप लेकाला १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे. याबाबत अधिधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर करीत आहेत.
हेही वाचा-