ठाणे - वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी व्यावसायिक गंगाप्रसाद यादव (वय-37) आणि अजिंक्य भोईर (वय-24) या विद्यार्थ्याला प्रत्येकी पाच-पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. यात यादव याने पोलिसांवर हात उचलल्याने त्याला पाच हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती शैलेंद्र तांबे यांनी निकाल दिला. सरकारी वकील म्हणून संध्या जाधव यांनी काम पाहिले. दोघेही तरुण प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने चूक सुधारण्यासाठी न्यायमूर्तीनी दोघांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.
हेही वाचा - महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
ठाणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस शिपाई देविदास तायडे हे 25 ऑक्टोबर 2018 रोजी वागळे इस्टेट येथील कामगार नाका येथे कर्तव्य बजावत होते. तेव्हा, भरधाव वेगात निघालेल्या विनाहेल्मेट दुचाकीस्वार यादव याला तायडे यांनी थांबवले. तसेच वाहतुकीचा नियम डावलल्याप्रकरणी 500 रुपये दंड भरण्यास फर्मावले. त्यानंतर यादव याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन तायडे यांच्यावर हात उचलला. यात तायडे यांच्या गणवेशाली लावलेली नेमप्लेट तुटून पडली. तर, त्याचठिकाणी दुसऱ्या घटनेत विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या भोईर याला रोखले असता त्यानेही पोलिसांशी हुज्जत घातली होती.दोन्ही प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - धावत्या रेल्वेखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू