ठाणे : शेतकऱ्यांचा कैवार घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यासाठी काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात 'कांद्याची निर्यात बंद करा' अशी घोषणा स्वतः ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीच द्यायला सुरुवात केली. मग काय त्यांच्या पाठोपाठ सर्वांनीच कोणताही विचार न करता त्यांना या घोषणाबाजीत साथ दिली आणि कांद्याची निर्यात बंद करा, अशी मागणी केली.
केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. यामुळे, शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या विरोधात ठाण्यात आज काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात शेतकऱ्यांचा कमी आणि काँग्रेस नेत्यांचाच जयजयकार जास्त ऐकायला मिळत होता. स्थानिक नेते प्रसारमाध्यमांसमोर येण्यासाठी धडपडताना स्पष्ट दिसत होते. परंतु, हे आंदोलन नक्की कशासाठी आहे, याची कल्पनादेखील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना नसल्याचे सत्य उघड झाले. बराच वेळ चाललेल्या या घोषणाबाजीत गडबड असल्याची बाब, प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी लक्षात आणून दिली. यानंतर यात दुरुस्ती करण्यात आली. केंद्रातील भाजपा सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून त्यामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ नये, यासाठी ही बंदी त्वरित रद्द करावी, अशी मागणी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली.
हेही वाचा - पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान वाचले महिलेचे प्राण... व्हिडीओत थरार झाला कैद