ठाणे - जालना येथील तरुणीवर मुंबईत झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात शुक्रवारी सायंकाळी ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला.
मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या जालना येथील तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या नराधमांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी. या मागणीसाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचा निषेध करत ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश सदस्य मिलिंद खराडे, जेष्ठ काँग्रेस नेते सुभाष कानडे, प्रदेश सचिव के.वृषाली, युवक अध्यक्ष विनर बिंद्रा, महिला अध्यक्ष शिल्पा सोनोने, सोनलक्ष्मी घाग, भाई ठाणेकर, बी एन सिंग आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. प्रदेश सदस्य मिलिंद खराडे यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोदी व फडणवीस सरकारच्या राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. परंतु आरोपींवर सरकार कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे सत्तेचे राजकारण करणाऱ्या या सरकारला धडा शिकवला पाहिजे. यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी सांगितले. तसेच ८ दिवसात सरकारने याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. नाहीतर उग्र आंदोलन छेडले जाईल, असे मोर्चाचे आयोजक प्रदेश सदस्य मिलिंद खराडे यांनी सांगितले.